Ad will apear here
Next
आरोग्य आणि संस्कारांचा वसा घेतलेले सेवा आरोग्य फाउंडेशन


समाजातील दुर्लक्षित, आर्थिकदृष्ट्या मागे असलेल्या घटकांना,
 शहरातील वस्त्यांमध्ये राहणाऱ्या पुणेकरांना अल्प मूल्यात आरोग्य सुविधा देण्याचे काम सेवा आरोग्य फाउंडेशन ही संस्था गेल्या दोन वर्षांपासून अविरतपणे करत आहे. आरोग्यवर्धन, किशोर विकास आणि समृद्धी वर्ग असे तीन उपक्रम संस्थेतर्फे राबविले जातात. जनजागृतीपर व्याख्यानांसह मुलांवर सुसंस्कार करणारे वर्गही ही संस्था आयोजित करते. ‘लेणे समाजाचे’ या सदरात आज माहिती घेऊ या सेवा आरोग्य फाउंडेशनच्या कार्याची...
...........
केंद्र आणि राज्यातील अशा दोन्ही सरकारांकडून नागरिकांसाठी विविध आरोग्य योजनांची घोषणा होत असते; पण त्या योजनांचा लाभ कसा घ्यायचा याची माहितीच अनेकांना नसते. मग पर्याय उरतो रूढ आरोग्य व्यवस्थेचा वापर करण्याचा. एखादा आजार किंवा व्याधी ज्याप्रमाणे गरीब-श्रीमंत, जात-धर्म पाहत नाही, तसेच महागडे वैद्यकीय उपचारही हे भेद जाणत नाहीत. एखाद्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले, की त्याची आर्थिक परिस्थिती कशीही असली तरीही तो स्वस्तात सुटत नाही, हे वास्तव आहे. याला उपाय काय? तर आजार होऊ नये याची काळजी घेणे आणि त्याला सुरुवातीला प्रतिबंध करणे. आरोग्य तपासण्यांचा खर्चही परवडत नाहीच; पण तो खर्च केल्यावर किमान पुढचा आजार आणि पर्यायाने खर्च टाळता येऊ शकतो. या पार्श्वभूमीवर, शहरातील वस्त्यांमध्ये राहणाऱ्या पुणेकरांना अल्प मूल्यात आरोग्य सुविधा देण्याचे काम सेवा आरोग्य फाउंडेशन ही संस्था गेल्या दोन वर्षांपासून अविरतपणे करत आहे.



आरोग्याच्या क्षेत्रात सेवेचे काम करायचे आणि समाजातील दुर्लक्षित, आर्थिकदृष्ट्या मागे असलेल्या घटकांना त्याचा फायदा झाला पाहिजे, ही सूत्रे घेऊन १६ मार्च २०१७ रोजी सेवा आरोग्य फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. प्रदीप कुंटे, रवी शिंगणापूरकर, डॉ. प्रवीण दबडघाव यांनी संस्थेची स्थापना करतानाच ‘सर्वांसाठी संपूर्ण आरोग्य’ हे उद्दिष्ट निश्चित केले. पुणे शहरातील झोपडपट्ट्या, मध्यम वस्त्या यांमध्ये काम सुरू करण्यापूर्वी घरोघरी जाऊन आरोग्याबाबतचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणातून घरातील महिला, पुरुष, मुले-मुली, ज्येष्ठ नागरिक यांच्या आरोग्याबद्दल प्राथमिक माहिती देणारा अहवाल तयार झाला.

महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता, सांधेदुखी, मासिक पाळीशी संबंधित विकारांचे प्रमाण मोठे आहे. लहान मुलांमध्ये डोळे आणि दातांच्या आजारांचे प्रमाण मोठे आहे. ती वारंवार आजारी पडतात. वयात आलेल्या मुलांना आणि मुलींना शारीरिक बदलांबाबत, स्वच्छतेबाबत माहिती नाही. ज्येष्ठ नागरिकांमध्ये मोतिबिंदू होण्याचे प्रमाण व आरोग्याशी संबंधित इतर अनेक तक्रारी आहेत, अशी अनेक निरीक्षणे समोर आली. याचे प्रमुख कारण म्हणजे सरकारी यंत्रणा समाजातील या घटकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. पुण्यासारख्या शहरातील ही परिस्थिती पाहून फाउंडेशनने विविध उपक्रम सुरू केले. त्याबद्दल संस्थेच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी डॉ. हर्षदा पाध्ये यांनी माहिती दिली.

डॉ. पाध्ये म्हणाल्या, ‘आम्ही प्रामुख्याने आरोग्यवर्धन, किशोर विकास आणि समृद्धी वर्ग असे तीन उपक्रम राबवतो. आरोग्यवर्धन उपक्रमात आम्ही नेमलेले वस्ती समन्वयक, वस्तीतील आरोग्यमैत्रिणी दररोज प्रत्येकी पाच घरांना भेटी देऊन कुटुंबाचा आरोग्य अहवाल तयार करतात. गेल्या दीड वर्षात सुमारे १६ हजार ६२४ गृहभेटी झाल्या आहेत. आरोग्य तपासणी शिबिरे घेऊन त्यामध्ये सर्वसाधारण तपासणी, रक्त तपासणी करून रुग्णांना औषधे दिली जातात. गरज वाटली तर रुग्णांना हॉस्पिटल, विशेषज्ञांकडे जाण्याचा सल्ला दिला जातो. रुग्ण डॉक्टरांकडे गेला का, औषधे घेत आहे का याचा पाठपुरावा करण्यासाठी आरोग्यमित्र किंवा आरोग्यमैत्रिणी काम करतात. या वस्त्यांमध्ये साप्ताहिक ओपीडी चालवली जाते, आवश्यकतेनुसार डॉक्टर औषधे देतात. गेल्या दीड वर्षात सुमारे पाच हजार रुग्णांनी ओपीडी सेवेचा लाभ घेतला असून, त्यापैकी सुमारे ३२० जणांना पुढील तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. ताराचंद रुग्णालयासह इतरही रुग्णालयांशी संस्थेची बोलणी झाली असून, संस्थेच्या शिफारशीनुसार रुग्णांना तेथील उपचारांच्या खर्चात सूटही मिळते. नेत्र परीक्षणानंतर ९२ रुग्णांवर मोतिबिंदू शस्त्रक्रिया झाल्या, तर २०० जणांना चष्मे देण्यात आले आहेत.’

याच उपक्रमांतर्गत स्त्रियांचे आजार, आहार, स्वच्छता, व्यसनाधीनता अशा विषयांवर जनजागृती करणारी व्याख्यानेही आयोजित केली जातात. सर्वांगीण आरोग्यवर्धन उपक्रमांतर्गत सेवा सहयोग संस्थेच्या वतीने वस्त्यांमध्ये चालवल्या जाणाऱ्या ८० पैकी १२ अभ्यासिकांमधील मुलांच्या प्राथमिक आरोग्य, दंत व नेत्र तपासण्या करून त्यांच्यावर उपचारही करण्यात आले आहेत. तसेच सिंहगड रस्त्यावरील स्वानंद जनकल्याण संस्थेच्या समृद्धी वर्गात येणाऱ्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व उपचारही फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहेत.

वैद्यकीयदृष्ट्या उपेक्षित असलेल्या दिवड गावामध्ये सेवा
‘प्रामुख्याने कोथरूड, कर्वेनगर, वारजे, सिंहगड रस्ता व बावधन या भागातील वस्त्यांमध्ये फाउंडेशनचे चाललेले काम पाहिल्यानंतर झेड. एस. असोसिएट्स कंपनीच्या सीएसआर उपक्रमांतर्गत हिंजवडीजवळ दिवड गावात ओपीडी सुरू करण्याची संधी फाउंडेशनला मिळाली. हे गाव पुण्यापासून जवळच आहे; पण त्या गावात एकही दवाखाना किंवा औषधांचे दुकान नाही. मारुंजी या नव्याने विकसित झालेल्या परिसरापासून हे गाव जवळ आहे; पण उपचारांची सुविधाच नसल्याने कोणताही आजार अंगावर काढण्याची सवय गावकऱ्यांना लागल्याचे सर्वेक्षणानंतर आमच्या लक्षात आले. या गावात सावळे या विस्तारित कुटुंबात दीड हजार जण आहेत. त्यातील ३०-४० जणांना मधुमेह झाल्याचे आमच्या तपासणीत लक्षात आले; पण कोणीही उपचार, गोळ्या काहीच घेत नसल्याचेही समोर आले. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आता फाउंडेशनने तिथे ओपीडी सुरू केली असून, तिथे आरोग्य शिबिरे, समुपदेशन सत्रे घेतली जातात,’ असेही डॉ. पाध्ये यांनी सांगितले.



फाउंडेशनच्या या सगळ्या आरोग्यविषयक कामात सेवा भावनेने काम करणाऱ्या डॉक्टरांचा मोठा वाटा आहे. त्याबद्दल डॉ. पाध्ये म्हणाल्या, ‘आपल्या उत्तम चाललेल्या व्यवसायातून सेवेसाठी वेळ काढणे तसे अवघड काम असते. फाउंडेशनच्या कामात या डॉक्टर मंडळींचे मोलाचे योगदान आहे. डॉ. अरुण निरंतर, डॉ. अलका निरंतर, डॉ. सचिन भोसले, डॉ. नेहा गुंजिटे, डॉ. अमोल पवार, डॉ. उज्ज्वला पवार, डॉ. सिद्धी चंद्रात्रे, डॉ. सुमित येसुमाळी, डॉ. राधिका भोजराज, डॉ. प्रवीण मेंगडे, डॉ. कावेरी सांगळे, डॉ. मीनल जेऊरकर, डॉ. संतोष जैन, डॉ. पूजा कोटस्थाने, डॉ. देवश्री खरे, डॉ. रश्मी गानू, डॉ. वैजयंती गद्रे, डॉ. आदिती देशपांडे, डॉ. माधवी भिसे, डॉ. केतन उमक, डॉ. हेमांगी पाटसकर, डॉ. सुनीता धारूरकर हे सगळे डॉक्टर आपल्या व्यवसायातून वेळ काढून या ‘ओपीडी’साठी उपलब्ध असतात. त्यामुळे २०१८ या वर्षात विविध वस्त्यांत आम्ही दररोज चार तास ओपीडी सेवा पुरवू शकलो.’  



‘घे भरारी’ प्रकल्प
वयात येणाऱ्या मुला-मुलींच्या समस्या लक्षात घेऊन फाउंडेशनने किशोर विकास प्रकल्प सुरू केला त्याला ‘घे भरारी’ हे नाव दिले आहे. ‘वस्तीमधील मुलींच्या आरोग्याकडे खूप दुर्लक्ष होते, असे सर्वेक्षणातून आमच्या लक्षात आले. किशोरवयात मुले आणि मुलीच्या शरीरांत होणाऱ्या बदलांची माहिती त्यांना योग्य पद्धतीने मिळाली नाही, तर ते वाट भरकटतात. त्यामुळे ‘घे भरारी’ उपक्रमांतर्गत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातात. या वस्त्यांमध्ये दर आठवड्याला दीड तासाचे एक सत्र घेतले जाते. त्यामध्ये फाउंडेशनचे प्रशिक्षित कार्यकर्ते खेळ, कृतिसत्रे, वृत्तपत्र वाचन, गटचर्चा, गप्पा, गाणी म्हणून घेतात. या मुलांसाठी कार्यशाळा, सहल यांचे आयोजन केले जाते. असे सध्या मुलींचे तीन आणि मुलांचे दोन वर्ग सुरू आहेत. त्यामध्ये ७५ मुले-मुली सहभागी होतात,’ असे डॉ. पाध्ये यांनी सांगितले.

डॉ. पाध्ये म्हणाल्या, ‘फाउंडेशनच्या कामात संजीव बेंद्रे, अनिल गुत्ती, डॉ. मृणाल वर्णेकर हे संचालक आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी दीपक अष्टपुत्रे यांचे योगदान आहे. व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने मुलांवर चांगले संस्कार होणे गरजेचे असते. त्यासाठी फाउंडेशन विविध वस्त्यांमध्ये दर शनिवारी आणि रविवारी समृद्धी वर्ग चालवते. खेळ, गाणी, गोष्टी, हस्तकला, चित्रकला अशा वेगवेगळ्या माध्यमातून मुलांना नवनवीन विषयांची ओळख करून दिली जाते. असे सहा वर्ग आज चालू आहेत. यामुळे मुलांचे पाठांतर चांगले झाले, मुले धीट बनली आणि स्वच्छ राहू लागली आहेत. वर्गाची आवड निर्माण झाली. पालक या वर्गांवर अतिशय समाधानी आहेत.’



सेवा आरोग्य फाउंडेशनच्या एकूण कामामध्ये २५ सहकारी काम करतात. समाजातील प्रश्नांची संख्या मोठी असल्याने उपायही मोठ्या प्रमाणात करायला हवेत. त्यासाठी फाउंडेशनला निधी आणि स्वयंसेवकांचीही गरज भासते. त्यासाठी संस्थेच्या वतीने नेहमी मदतीचे आवाहन केले जाते. सामाजिक काम करण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. तुम्हीही उत्सुक असाल तर सेवा आरोग्य फाउंडेशनशी संपर्क साधू शकता आणि समाजाचे प्रश्न सोडवण्याच्या प्रयत्नांत खारीचा तरी वाटा नक्की उचलू शकता.

संपर्क : वैशाली लोखंडे, प्रशासन अधिकारी, सेवा आरोग्य फाउंडेशन
मोबाइल : ९०७५० ८१९६९
संस्थेचा पत्ता : सी १ -१०, शांतिबन सोसायटी, एकलव्य कॉलेजजवळ, डीपी रोड, कोथरूड, पुणे - ३८
वेबसाइट : http://www.seva-arogya.org/

- अमोल अशोक आगवेकर 
ई-मेल : amolsra@gmail.com

(सेवा आरोग्य फाउंडेशनच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी डॉ. हर्षदा पाध्ये यांच्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत. सेवा आरोग्य फाउंडेशन या संस्थेबद्दलची डॉक्युमेंटरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील ‘लेणे समाजाचे’ या सदरातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/CAiHJu या लिंकवर उपलब्ध आहेत.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZSQBW
Similar Posts
नवजीवन देण्यासाठी धडपडणारी ‘रीबर्थ फाउंडेशन’ पुण्यातील रीबर्थ फाउंडेशन ही संस्था अवयवदानासंदर्भात जनजागृतीचे अत्यंत महत्त्वाचे कार्य करते. या संस्थेने अवयवदानासंदर्भात माहिती देणारी टोल फ्री हेल्पलाइनही सुरू केली आहे. तसेच जनजागृतीसाठी शॉर्टफिल्म स्पर्धेसह विविध प्रकारचे उपक्रम ही संस्था राबवत असते. ‘लेणे समाजाचे’ या सदरात आज माहिती घेऊ या रीबर्थ फाउंडेशनच्या कार्याची
दाते आणि गरजूंना जोडणारा ई-सेतू आपल्या समाजात वस्तू दान करू इच्छिणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्याचबरोबर विविध वस्तूंची गरज असलेल्यांचीही संख्या लक्षणीय आहे; पण या दोन्ही घटकांना एकमेकांबद्दल नेमकी माहिती नसते. दात्यांना गरजूंपर्यंत आणि गरजूंना दात्यांपर्यंत नेमकेपणाने पोहोचवणारा ई-सेतू ‘डोनेट एड सोसायटी’ या संस्थेच्या वेबसाइटच्या माध्यमातून नितीन घोडके या तरुणाने बांधला
भिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’ भारतातल्या अनेक समाजसुधारणांचं माहेरघर असलेल्या पुण्यातल्या तरुणाईनं नवं अभियान सुरू केलं आहे. कोंढव्यातल्या लुल्लानगरमध्ये राहणाऱ्या विशाल ओव्हाळ, संदीप बधे आणि अमोल वाघमारे या तरुणांनी रस्त्यांवर भीक मागणाऱ्या भिक्षेकऱ्यांना भिक्षावृत्तीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न चालवला आहे. ‘भिक्षेकऱ्यांना भीक
वस्तुवापराचं वर्तुळ ‘पूर्ण’ करणारी संस्था ‘टाकाऊतून टिकाऊ’ हा विचार केवळ लिहिण्यापुरता मर्यादित न ठेवता तो तंतोतंत अंमलात आणण्यासाठी धडपडणारी पुण्यातली संस्था म्हणजे पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन. प्लास्टिक, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे आदींचा योग्य आणि अभ्यासपूर्ण पुनर्वापर, जनसामान्यांमध्ये जागृती, सॅनिटरी नॅपकिन्सची शास्त्रीय विल्हेवाट असे पर्यावरणविषयक अनेकविध उपक्रम ही संस्था राबवते आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language